सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

भाऊसाहेब बान्दोडकर मैदान टाळेबंदीनंतर


आज  सकाळीच (सोमवार दि. ५ जुलै) वॉकिंग ला गेले असताना मैदान खुल दिसल आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी रोजच्यापेक्षा दुप्पट गतीने मैदानाचे गेट ओलांडून आत गेले आणि अक्षरशः त्या माझ्या प्रिय मैदानाला साष्टांग दंडवत घातला. मला खूपच हल्के हल्के वाटले .माझी अवस्था एकदम फुलपाखराप्रमाणे पंख फुटल्यागत झाली. कोरोनाच्या भितीने टाळेबंदी च्या कालावधीत बंद असलेले हे मैदान तब्बल दोन महिन्यानी खुले झालेले पाहून अती आनंदाबरोबरच मनात अनेक विचारांचे काहूर उठले. होते नव्हते  ते सगळे विचारही मनात येऊन गेले. मैदानालाही असेच वाटलेअसेल का ?

असंख्य पानानी ,छोट्या छोट्या फान्द्यानी तरारून उठलेली मेन्दीची झुडूपे पहिल्यानेच इतकी  ताजी तवानी दिसत होती. कोपऱ्यावरचा कडूनिंब आपल्या श्वेतपर्णाचा भार झेलत उंच उंच जात होता. वॉकिंग ट्रॅक सोडला तर संपूर्ण मैदान हिरव्या तृणपात्यानी आणि दुर्वांकुरानी  सजले होते. या हिरवळीवरील जलबिंदूना कुरवाळताना ते एखाद्या तृप्त मातेप्रमाणे मला भासले.

मी नेहमीप्रमाणेच धीम्या गतीने चालायला सुरुवात केली. प्रत्येक पावलागणिक मनात विचारांचे मंथन चालू होते. आज अगदी तुरळक माणसे चालायला आली होती. माझ्या मागे पुढे चालत होती. सगळीकडे कसे शांत होते. आकाशात मेघ दाटून आले होते. आत्ता जोराचा वर्षाव होईल असेच वाटत होते पण मधूनच एखाद-दुसरा थेंब गळत होता. जणू आज मेघानाही आम्हाला चालण्याचा आनंद लुटू द्यायचा होता. ते दाटून आले पण बरसले नाहीत. उलट न बरसताच लांबून कौतुकाने एकटक बघतच राहिले.

मी चालतच होते. एक दोन तीन फेऱ्या झाल्या आता थोडी माणसे वाढली कुजबुज ही वाढली. पण प्रत्येक जण स्वतःच्या गतीने चालण्यात दंग होता. ना स्पर्धा ना चढाओढ. कंपाऊंडच्या बाहेरून रानझाडांची दाटी वाढली होती. मध्येच एखादा बांबू लक्ष्मणरेषा ओलांडून आमच्यावर चवर्‍या ढाळत असल्याचा मला भास झाला. कोणी कुंपणावरून गवत पात्याकडे पाहून फुटबॉल खेळायला कसा मिळणार याविषयी मनात आडाखे बांधत असावा.

मी चालतच होते. मनातून आनंदले तर होतेच. इतक्यात मागून" गुड मॉर्निंग मॅम ,आज  साब नही आये" असे म्हणत बंगाली बाबू आले. मी त्याना " साब 5 बजे आके गये" असे सांगत असतानाच ते पुढे चालत गेले सुद्धा. पुन्हा शांतता, कुजबुज, दबक्या आवाजात एकमेकांची विचारपूस चालली होती

इतक्यात अचानक चार-पाच तरुण मुले मैदानात येतानाच " जय श्रीराम" असा जयघोष करत आली. त्यानाही बहुधा माझ्या इतकाच आनंद झाला असावा. मैदान मात्र खडबडून जागे झाले. मला एकदम 18 जून च्या क्रांती मैदानावरील घोषणांची आठवण झाली. चालता चालता मी स्वतःला हरवून गेले पार पारतंत्र्याच्या काळात गेले. सन 1946 चा जून महीना. भारतातून कोणीतरी नेता मडगावात आल्याची चाहूल लागली होती. त्यावेळी इथे पोर्तुगीज सरकारचे भाषण बंदी सत्र चालू होते. ते त्यांना मोडायचे होते. झाले सगळ्या गोवाभर कानोकानी ही बातमी पसरली. 18 जून चा दिवस ठरला. आणि संपूर्ण गोव्यातून लोकं मडगावच्या दिशेने चालू लागले. 18 जून ची सकाळ. लोक दबकत, हळू आवाजात कुजबुजत मैदानाच्या आजुबाजूला घोळक्या घोळक्याने उभी होती. इतक्यात ते पुढारी राम मनोहर लोहिया नाव होते त्याचे, मैदानाजवळ आले. त्याना पाहून इतका वेळ शांतपणे आवाज न करता उभे राहिलेले लोक एकदम जवळ आले आणि त्यानी जोरात वंदे मातरम वंदे मातरम अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. जय श्रीराम च्या घोषणा ऐकून मला त्याघटनेची आठवण आत्ता का झाली असेल ? जसे भाषण बंदीच्या त्रासातून मुक्तता मिळाल्याचा आनंद त्यावेळी लोकांना झाला होता तसाच दोन महिने सतत घरात राहून कोंडलेला श्वास मैदानावर येताच अशाप्रकारे मुक्त आणि मोकळा झाला होता. मैदान मात्र शांतच होते. पण मनातून कुठेतरी सुखावले होते

गेले दोन महिने एक तर घरातच चालायचे किंवा सकाळी लवकर उठून रस्त्यावरून लांबपर्यंत चालताना सतर्क राहावे लागे. कधी मागून तर कधी पुढून एखादी दुचाकी चार चाकी गाडी येत जात असायची त्यामुळे  रस्त्याचे नियम पाळून चालावे लागे. सारखे लक्ष ठेवावे लागे. मधूनच एखादा बैल समोर दत्त म्हणून उभा ठाकला की पाचावर धारण बसायची. कधीकधी एखादे मस्तवाल कुत्रे गुरगुरून अंगावर यायचे .तोंडावर मास्क तर असायचाच. आमच्या सारखेच अजून कोणी चालत येणारे त्याने मास्क घातला आहे किंवा नाही याकडेही लक्ष ठेवायला लागे. त्यामुळे चालण्याचा आनंद मनसोक्त घेता येत नसे. तरीसुद्धा आजूबाजूचे निसर्गाचे सौंदर्य मात्र अचूक टिपता येई. चालताना वाटेत देवी शांता दुर्गेचा कळस पाहिला की आपोआप हात जोडले जात. तेही दिवस गेले आणि आज मैदान खुले झाले. आता बिनधास्त चालायला मिळेल. व्यायामही करता येईल. कठड्यावर बसून गप्पाही मारता येतील. नेहमी येणारे ओळखीचे, नव्याने ओळख झालेले, मित्र मैत्रीणी, कदाचित काही अनोळखीही  माणसांशी गप्पा मारता येतील. हाय हॅलो कसा आहेस कशी आहेस. मी बरा आहे तू कसा आहेस? याची देवाणघेवाण होईल. नवीन नवीन गोष्टी कळतील. फिरण्याचा आनंद घेता येईल तो वेगळाच.

माझ्या  फेर्या पूर्ण होत आल्या. मैदानातल्या बाकावर बसून  व्यायाम केला. उगवत्या सूर्याकडे पाहून नमस्कार केला. आज मला खूप बरे वाटत होते. दूरच्या प्रवासाला जाऊन परत घरी आल्यावर आणि घरचा ताज्या दुधाचा चहा प्याल्यावर मोकळे मोकळे वाटते, तसेच आज मला लॉक डाऊन नंतर  मैदानावर आल्यावर वाटतं.

मी देवाकडे प्रार्थना केली देवा, असे कितीही करोना आले तरी  मैदान मात्र खुलेच असूदे रे देवा!


शुभदा मराठे

भाऊसाहेब बान्दोडकर मैदान टाळेबंदीनंतर

आज  सकाळीच (सोमवार दि. ५ जुलै) वॉकिंग ला गेले असताना मैदान खुल दिसल आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी रोजच्यापेक्षा दुप्पट गतीने मैदानाच...